देवालयाचा ईतिहास

देवालयाचा ईतिहास पुर्वी भारतवर्षातील महाराष्ट विदर्भ, खान्देश भागामध्ये पाटणा (विज्जलगड) प्रांत ऎतिहासिक महत्वाचा होता. येथे पुर्वी यादव सम्राट व त्यांचे मांडलिक राजे यांचे राज्य होते. त्यावेळी हे शहर ४-५ मैल लांबी रुंदीचे होते. शहराचे भोवती ऊंच पर्वतीय तट तसेच शहरांमध्ये निसर्ग सौंदर्य वाढविणारी अनेक वॄक्ष-वेली यामुळे हे शहर प्रेक्षणीय होते. शहराचे राजमार्ग विशाल असून दुतर्फा निरनिराळी फळझाडे लावलेली होती.
पर्वताचे ऊंच भागावर पाण्याचे टाके खॊदून नळाद्वारे शहरामध्ये पाणी पुरवठा केलेला होता. शहरामधील धातूच्या खाणी व पर्वतावरील निरनिराळ्या वनस्पतींमुळॆ हे शहर शालिवाहन शक काळापासुन व्यापार, कला, विद्या, रहदारी व देवस्थान यासाठी खूप प्रसिध्द होते. त्यावेळी यादवांचे मांडलिक राजे यांनी वाघळी येथील सिध्देश्वर मंदिर (शके ९९१) बहाळ येथील शारदादेवी मंदिर (शके १९४४) व पाटणा येथील चंडिकादेवी मंदिर ( शक पुर्व कलिन स्थापना असलेले) शके ११२८ ही देवालये यादवराव खॆऊणचंद्र व गॊविंदराज मौर्य यांनी शके ११५० आषाढ ३० सूर्य ग्रहणावर पितृ स्मृती स्मरणार्थ लोकदर्शनास्तव खुली केल्याचा उल्लेख श्री संत जनार्दनचरित्रामध्ये आहे. त्यावेळी त्यांचे दरबारामध्ये उपमण्यु गोत्री देशपांडे यांचे मूळ पुरुष कृष्णदेव यांचेकडे व्यवस्थापन कार्य होते. त्यांना त्या प्रित्यर्थ चाळीस लहान लहान वाड्यांचे अधिपत्य भूमीसह देऊन देशपांडेपण दिले होते. ते पुढे त्याच ठिकाणी रहिवासाकरिता राहिल्यामुळे तो भाग चाळीसगाव म्हणुन ओळखला जावू लागला.पुढे शके १२१६ चे सुमारास अल्लाउद्दिन खिलजी एलिचपूर देवगिरी ( दौलताबाद ) कडे रामदेवराय यादवास कपटाने जिंकण्यास गेला. एकीकडून गुलबर्गा येथे स्थापन झालेली बहामनी शाही व दुसरीकडून दिल्ली मोगल साम्राज्य यात हा प्रांत अडचणीत सापडला. त्यामुळे पूर्वीच्या हिन्दु राज्याची धर्ममय प्रभावशाली राज्यप्रणाली जावून तेथे इस्लामी धर्मसत्ता शके १२१६ पासून आली. चतुवर्ण व सनातन हिंदू धर्म जर्जर झाला व सर्वत्र एकजात इस्लाम धर्माचे हिरवे निशाण फडकू लागले व हा प्रान्त नामशेष झाला.आज असलेले चंडिका ( पाटणा) देवी मंदिर हे एक शक्तिपीठ आहे. ह्या शक्तिपीठाचे नाव वरदहस्त असे आहे. ह्या शक्तिपीठा संदर्भात कथा अशी आहे की, सतीचे वडील दक्षप्रजापती त्यांनी एकदा पुत्रसंतान प्राप्तीसाठी पुत्र कामेष्टी यज्ञ केला. परंतु शिव – सतीस यज्ञाचे निमंत्रण दिले नाही. कारण शिव-सतीचा विवाह वडील दक्षप्रजापती यांचे मनाविरुध्द झाला,ह्या विवाहास त्यांची संमती नव्ह्ती. हे एक यज्ञास न बोलविण्याचे मुख्य कारण तसेच शिवजीचे सर्वभक्तगण स्मशाणात राहणारे , चित्रविचित्र पोषाख
करणारे, कफल्लक, अंगास भस्म फासणारे त्यामुळे ह्या डामडौलाच्या यज्ञ सोहळ्यात ह्या सर्वांचे प्रयोजन नाही असे कारण दाखवून दक्षप्रजापतीने शिव-सतीस निमंत्रण दिले नाही. भव्य अशा यज्ञ मंडपात यज्ञाची सुरुवात झाली. सर्व देव आपाआपला भाग घेण्यासाठी निमंत्रणाप्रमाणे आले हे पाहून नारदमूनी सतीस जावून भेटले. आपल्या रसभरीत मधुर वाणीने यज्ञाचे वर्णन सतीस ऎकवीले व विचारले की आपण अजून का गेला नाहीत. त्यावर सतीने आम्हास निमंत्रण नसल्याचे सांगितले त्यावर पितागृही भेटीसाठी व यज्ञाचे ठिकाणी दर्शनासाठी कुठ्ल्याही निमंत्रणाची जरुरी नाही हे युक्तीवादाने सतीस पटवून दिले. यज्ञाचे निमित्ताने गेल्यावर सर्वांच्या भेटी होतील. अशी इच्छा सतीने शिवजीस सांगितली. ही वेळ योग्य नाही ही गोष्ट शिवजींनी सतीस समजावीण्याचा प्रयत्न केला. परंतु श्रीहट्टापुढे तो जमला नाही. म्हणून त्यांनी सतीस एकटीने जाण्यास परवानगी दिली. सती नंदीसोबत यज्ञाचे दर्शनासाठी सर्व प्रथम पितॄगॄही गेली. त्या ठिकाणी जमलेल्या सर्व आप्तगणगोतांनी विनानिमंत्रण तू का आलीस असे हिनवून सतीचा अपमान केला. वादविवाद टाळून हा अपमान सतीने सहन केला. सती पुढे यज्ञमंडपाकडे निघाली तिथे गेल्यावर सर्व देवतेंचे भाग यज्ञपीठावर मांड्लेले सतीने पाहिले. परंतु महादेवाचा भाग त्या ठिकाणी नव्हता असा शिवजीचा अपमान योग्य नाही हे समजाविण्याचे प्रयत्न सतीने केला पण अभिमानाने व गर्वाने धूंध झालेल्या दक्षप्रजापतीस सतीचे म्हणणे पटले नाही. उलट शिवजी तुझे पती आहे त्यामुळे हे तु बोलतेस व त्याने सतीस तू यज्ञमंड्पातून चालती हो असे सांगितले त्यामुळे देवधीदेव महादेवासह आपल्या पतीचा हा अपमान सतीकडून सहन न झाल्यामुळे सतीने आपल्या पित्याकडून निर्माण झालेले शरीर हे य़ज्ञ मंड्पातच संपविण्याचा निश्चय केला. तिने आत्मशक्ती जागृत करुन शरीरातुन प्राण काढून घेतला व ती निष्प्राण झाली ही गोष्ट शिवजीस नंदीने जावून सांगितली. शिवजी खूप क्रोधीत झाले त्यांनी आपल्या जटा आपटून विरभद्र निर्माण केला व दक्षयज्ञाचा विद्ध्वंस केला व सतीचे शव दोन्ही हातात घेवून कैलासाकडे जावयास निघाले परंतु पत्नी वियोगाचे क्रोधामुळे तांडव नृत्य करु लागले. त्यातच त्यांचा तिसरा नेञ उघडला गेला व जो समोर येइल तो भस्म होवू लागला. अश्या ह्या संहारामुळे सर्वांचा विनाश होइल अशी काळजी सर्व देवांना पडली. त्यावळी सर्व देव भगवान विष्णुकडे शरण गेले ह्यावर काही उपाय योजना करावी अशी विनंती केली त्यावेळी भगवान विष्णुंनी क्रोधाचे कारण असलेले शिवजीच्या हातातील सतीचे शव नष्ट करण्याशिवाय दूसरा मार्ग नाही हे लक्षात घेवुन आपल्या सुदर्शन चक्राने शिवजीच्या हातातील शवाचे तुकडे केले. ज्या ज्या ठिकाणी त्या शवाचा तुकडा पडला त्या त्या ठिकाणी एक शक्तिपीठ निर्माण झाले. मंदिरा मागील डोंगरावर भगवतीसतीच्या उजव्या हाताचा पंजा तुटून पडल्यामुळे त्या ठिकाणी वरदहस्त शक्तिपीठ निर्माण झाले. शक्तिपीठाची मुळ जागा डोंगराच्या उंच कडेवर आहे.भगवतीचे आद्य उपासक गोविंद स्वामी यांनी भगवतीची नित्य उपासना केली. वृध्दापकाळाने गात्र शिथील होवु लागले. त्यामुळे उपासनेत खंड पडेल ह्या विचाराने ते चिंतीत झाले. त्यावेळी एक अनुष्ठान त्यांनी केले त्यावेळी भगवतीने त्यांचेवर प्रसन्न होवून दर्शन दिले व वरदान मागण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी भक्तांसाठी व स्वतःकरीत असलेल्या नित्य उपासनेसाठी भगवतीने उंच कडेवरुन खाली यावे अशी विनंती केली. आपल्या परमप्रिय भक्तासाठी ही विनंती मान्य केली. मी तुझ्या भक्तिपोटी तुझ्याबरोबर खाली येइल पण मी मागे येत असताना तु मागे वळून पाहू नये असे सांगितले त्याप्रमाणे भगवती आपल्या परमप्रिय भक्तामागे येवु लागली डोंगरकडा उतरुन आल्यावर गोविंदस्वामी धवलतिर्थ कुंडाजवळ येवून पोहचले व त्यांनी अल्हादकारक जलपान करुन आपली त्रुषा शांत केली पुढील मार्गक्रमणास सुरुवात करते वेळी त्यांना भोवळ आली व त्यातुन सावरताच त्यांना खूप मोठा कर्कश आवाज ऎकु आला. त्यामुळे ते भांबावून गेले व भगवती आपले मागे आहे किंवा नाही भान विसरुन त्यांनी मागे वळून पाहिले त्यावेळी भगवतीने त्यांना दर्शन दिले व त्याच ठिकाणी भगवती अदॄश्य झाली. घडल्या प्रकाराचे त्यांना खूप वाइट वाटले. पण ते दॄढ निश्चयाने ते त्या ठिकाणी मरणांत अनुष्ठानास बसले शेवटी भगवतीने त्यांना पुन्हा दर्शन दिले व सांगितले की मी तुझ्या मागे येणार नाही. तर तुला दिलेल्या वचन पुर्तीसाठी तू या कुंडात स्नान कर, स्नान करतेवेळी तुझ्या हातात स्वयंभू मुर्ती येइल ती तू घे व माझी स्थापना कर, अश्या रितीने स्नानानंतर गोविंद स्वामीच्या हातामध्ये पाषाणाची स्वयंभू मुर्ती आली. त्याच मुर्तीची स्थापना गोविंद स्वामींनी आजच्या चंडिकादेवी मंदिरात त्यावेळी केली.ह्याच मंदिराच्या दक्षिणेकडील बाजूस शिवमंदिर आहे. मध्यभागी विष्णू मंदिर आहे. तसेच गोविंद स्वामींनी आपल्या निश्चयाप्रमाणे अखंड निरंतर भगवतीची सेवा केली व सेवा करत असतानाच वचन पुर्तीसाठी जिवंत समाधी घेतली त्यांची समाधी आज मंदिराचे पुढे आहे.

आज मंदिरात असलेली मुर्ती खुपच भव्य आहे. तितिकीच प्रसन्न्मुख आहे. भक्तांनी एकदा दर्शन घेवुन त्यांचे समाधान होत नाही तर त्यांना पुन्हा पुन्हा दर्शन घ्यावेसे वाटते. भक्तांना मंदिरातुन निघावेसे वाटत नाही काही तर भगवतीचा प्रसन्न व हसतमुख चेहरा पाहुन आपले भानच विसरुन जातात.

अनेक हिन्दु जाती-जमातीची ही कुलस्वामीनी आहे. आजही कुलधर्म कुलाचारात बरेच भक्त धवलतिर्थातून भगवतीचे स्मरण करुन पुजेसाठी तांदळा नेतात दरवर्षी भगवतीचे शारदीय नवराञ महोत्सव व वासंतीक यात्रा महोत्सव मोठ्या प्रमाणात भक्तांचे हर्ष उत्साहात साजरे होतात दर पौर्णिमेस भगवतीची महापूजा करण्यात येते. भक्तांच्या मुलभूत गरजा पुरविण्याच्या दॄष्टीने पाटणा निवासिनी चंडिकादेवी प्रतिष्ठाण या न्यासाची नोंदणी करण्यात आली आहे. आपल्या उद्देशपुर्तीसाठी प्रतिष्ठाण प्रयत्नशील असते. दर पोर्णिमेस प्रतिष्ठाणांमार्फत महाप्रसाद वितरण माध्यान्य कालीन पूजेनंतर केला जातो. तसेच न्यासाने यात्रीनिवास बांधण्याचे काम सुद्धा हाती घेतले आहे. आज हे मंदिर भारतीय पूरातन विभागाचे निग्राणीत आहे. येणा-या भाविकांसाठी व पर्यटकांसाठी वनखात्यामार्फत काही खोल्या मुक्कामासाठी उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. तसेच नवस व इतर कार्यक्रमासाठी एक धर्मशाळा उपलब्ध करुन दिलेली आहे हे स्थान प्रत्येक भगवती उपासकाने पाहण्यासारखॆ आहे.

ई-मेल: contact@patnadevi.com